Dharashiv Crime: धाराशिव जिल्ह्यातील मंगरूळ गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी याप्रकरणी मृताच्या पत्नीसह सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ओढ्याच्या काठावर रक्ताचा सडा
कृष्णाथ साठे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी कृष्णाथ नेहमीप्रमाणे प्रात:विधीसाठी गावाबाहेरील ओढ्याकडे गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर ओढ्याकाठी असलेल्या पळसाच्या झाडाखाली त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
हल्ल्याचा भीषण थरार
हल्लेखोरांनी कृष्णाथ यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला आणि तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी मृतदेह तब्बल ९० फूट अंतरापर्यंत ओढत नेला आणि झुडपात फेकून दिला. घटनास्थळावरील रक्ताचे ओघळ आणि फरपटत नेल्याच्या खुणा पाहून या कृत्याची भीषणता स्पष्ट होत आहे.
तपासाची चक्रे फिरली: ७ संशयित ताब्यात
या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून पोलिसांनी तपासाचा रोख वळवत कृष्णाथ यांच्या पत्नीला आणि गावातील इतर ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तुळजापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात असून, संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समोर येईल, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे मंगरूळ गावात शोककळा पसरली असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


