पुणे: पुणे शहरात मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांना अखेर पुणे पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे. पुण्यात तरुणांनी मित्राच्या वाढदिवसानंतर रस्त्यावरच नाचगाणे करत, मोठ्या आवाजात गाणी वाजवून आणि दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकून परिसरात शांतता भंग केली. शुक्रवारी रात्री 11 नंतर या तरुणांचा ‘हाय-व्होल्टेज’ धिंगाणा सुरू झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना थेट चौकीत नेऊन समज दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणांनी गाडी रस्त्याच्या मध्ये उभी करून गोंधळ घातला. ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले. स्थानिकांनी पोलिसांना संपर्क केला आणि काही मिनिटांतच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या तरुणांकडून दारूच्या बाटल्या आणि वाहन जप्त केले. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार आणि वाहन नियमभंगाबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौकशीनंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस चौकीत नेऊन समज दिली आणि पुढील काळात असे वर्तन न करण्याचा लेखी माफीनामा घेतला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पुणे पोलिसांचे जोरदार कौतुक केले. सोशल मीडियावर या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल (ViralVideo) झाले असून अनेकांनी पोलिसांच्या तत्परतेचं समर्थन केलं आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शहरात शिस्त राखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे.


