Online Gaming Addiction: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. भारत सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी या मुलींची नावे असून, ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
“मी खेळणे सोडू शकत नाही…” : सुसाईड नोटमधील आर्त हाक
घटनेपूर्वी मुलींनी आपल्या खोलीत एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सोडली होती. “माफ करा आई आणि बाबा, मी खेळणे सोडू शकत नाही. या डायरीत लिहिलेले सर्व काही खरे आहे, कृपया ते आताच वाचा,” असा मजकूर त्यांनी लिहिला होता. कोविड-१९ च्या टाळेबंदीच्या काळात या मुलींना मोबाईल गेमिंगचे प्रचंड व्यसन लागले होते. पालकांनी त्यांच्या या सवयीवर आक्षेप घेत त्यांना वारंवार फटकारल्यामुळे त्यांनी रात्री २ च्या सुमारास इमारतीवरून उडी घेतली.
‘कोरियन लव्हर’ गेम ठरला जीवघेणा?
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, तिन्ही बहिणी ‘कोरियन लव्हर’ नावाचा एक ऑनलाइन टास्क-आधारित गेम खेळत होत्या. हा गेम खेळण्यावरून घरात वारंवार वाद होत असत. साहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे ऑनलाइन गेमिंगचे व्यसनच आत्महत्येला कारणीभूत असल्याचे दिसते. पोलीस सध्या या गेमच्या स्वरूपाचा आणि मुलींच्या मोबाईलमधील डेटाचा सखोल तपास करत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


