Harsool Suicide Case: छत्रपती संभाजीनगरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हर्सूल परिसरात एका २३ वर्षीय गर्भवती विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. आयशा अरबाज शेख असे या महिलेचे नाव असून, ती पाच महिन्यांची गरोदर होती. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हुंडाबळी आणि पतीच्या फसवणुकीचा आरोप
आयशाच्या मृत्यूला तिचे पती आणि सासरचे लोक जबाबदार असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. लग्नानंतर सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर, पतीने फसवणूक करून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आयशा प्रचंड तणावाखाली होती, असे नातेवाईकांनी सांगितले.
‘आय हेट माय लाईफ…’; सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण
आत्महत्येपूर्वी आयशाने एक चिठ्ठी लिहिली आहे. यात तिने आपल्या आयुष्यातील वेदना मांडल्या आहेत. या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलं आहे की, “मी आता खूप थकले आहे. अरबाज आणि त्याच्या घरच्यांनी माझा छळ केला. मी लग्न करून फसले, माझे आयुष्य खूप चांगले होते, पण आता सर्व संपले आहे. तो (अरबाज) माझ्यावर प्रेम करत नाही, तो सतत दुसऱ्या महिलेच्या (‘सोनी’) नावाचा जप करतो, हे ऐकून माझे मन सुन्न होते. आता मला कशातही रस उरलेला नाही.”
पोलिस कारवाई सुरू
हर्सूल पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयशाच्या चिठ्ठीच्या आधारे पती अरबाज सलीम शेख, सासू सायरा सलीम शेख आणि अलीम सलीम शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एक निष्पाप जीव आणि पोटातील अर्भकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


