Congress-Vanchit Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि समीकरणे बदलवून टाकणारी घडामोड घडणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत आज या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे, ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी लागू असेल.
दिग्गजांना जे जमलं नाही, ते सपकाळ यांनी करून दाखवलं
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मागील अनेक वर्षांत वंचितसोबतची युती प्रत्यक्षात आणता आली नव्हती. मात्र, विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने हा पेच सोडवला आहे. सपकाळ यांची नियुक्ती झाली तेव्हा अनेकांनी त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली होती, परंतु वंचितला सोबत घेऊन त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
निवडणुकीची समीकरणे बदलणार
वंचित बहुजन आघाडीमुळे यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन मोठा फटका बसला होता. आता दोन्ही पक्ष एकत्र आल्याने दलित, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपविरोधी मतांची फाटाफूट थांबणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या सध्याच्या रणनीतीमध्ये या युतीमुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आधीच उत्साह आहे, त्यात आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्याने पक्षाला नवे बळ मिळाले आहे. सपकाळ यांनी संघटनात्मक बांधणीवर दिलेला जोर आणि घेतलेला हा धाडसी निर्णय आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेससाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.


