Beed Crime News: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या निरागस बालिकेवर ५० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पाचवीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला गावातील एका किराणा दुकानदाराने फूस लावून दुकानात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने दोन महिन्यांपूर्वीही असाच प्रकार केला होता आणि त्यानंतर पीडितेने कोणाला काही सांगितल्यास तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. याच दहशतीचा फायदा घेऊन नराधमाने पुन्हा एकदा हे कृत्य केले.
नराधम पोलिसांच्या ताब्यात; अधिक तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी आरोपी बालाजी पांचाळ याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या तक्रारीनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि ओळखीच्या व्यक्तीकडूनच असे कृत्य झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
दरम्यान, नांदेड शहरात एका ४६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका ३९ वर्षीय व्यक्तीने पीडितेचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा एका मठातील ‘महाराज’ असून त्याचे पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. या संबंधांतून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांकडून तातडीने कारवाई
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नांदेडमधील भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ३९ वर्षीय आरोपी महाराजाला तत्काळ अटक केली आहे. या प्रेमसंबंधांतून झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू आहे. सध्या भाग्यनगर पोलीस या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करत असून पुढील तपास प्रक्रिया राबवत आहेत.


