Nalasopara News: सोशल मीडियावर स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा अपमान करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्या सूरज शिर्के या तरुणाला मनसेने ‘खळ्ळ खट्याक’ स्टाईलने धडा शिकवला. मनसैनिकांनी केवळ त्याला चोप दिला नाही, तर भररस्त्यात त्याची अर्धनग्न धिंड काढून माफी मागायला लावली.
नेमकं प्रकरण काय?
सूरज शिर्के हा तरुण केवळ ‘व्ह्यूज’ आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी सोशल मीडियावर दोन्ही ठाकरे बंधूंवर अर्वाच्च भाषेत टीका करत होता. त्याच्या या कृत्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप होता. सातत्याने इशारे देऊनही हा तरुण आपली मर्यादा ओलांडत होता, अखेर मनसेचे पदाधिकारी किरण नकाशे आणि त्यांच्या पथकाने या तरुणाचा शोध घेऊन त्याला गाठले.
मनसे स्टाईल चोप
मिळालेल्या माहितीनुसार, मनसैनिकांनी सूरजला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर संतापाच्या भरात कार्यकर्त्यांनी त्याला अर्धनग्न केले आणि सुमारे दीड किलोमीटरपर्यंत त्याची धिंड काढली. या कारवाईनंतर हादरलेल्या सूरजने हात जोडून जाहीरपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची माफी मागितली.


