Phaltan Doctor Death Case: फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकसह आणखी एका तरूणाच्या नावाचा उल्लेख आहे. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सत्य समोर येत असतानाच खासदाराचा उल्लेख होत आहे. कारण, काही दिवसांपूर्वी डॉक्टरने एका तक्रारीमध्ये खासदाराचा उल्लेख केला होता. पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आल्याचे त्यातून समोर आले होते.
महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर फलटणमध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली असून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने याने आपल्यावर चारवेळा बल्ताकार केल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच प्रशांत बनकर याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.
प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर या भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. तर मदने हा फलटण ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. त्याचे आता निलंबन करण्यात आले असून पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. दरम्यान, यापूर्वी पीडितेने यांनी आपल्यावर पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येत असल्याचे आणि त्यामुळे आत्महत्या करू, असा म्हटल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे खासदार नेमके कोण, याबाबत मात्र खुलासा झालेला नाही.
पीडित डॉक्टरने यापूर्वी याबाबत लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये एका खासदाराचा उल्लेख असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. खासदारांच्या पीएचा फोन आला होता. त्याच फोनवर पीडिता खासदारांशी बोलल्या. पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी, पेशंट रुग्णालयात न येता फिटनेस सर्टिफिकेटसाठी दबाव टाकला जात होता, असा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित खासदारांचे पीए पीडितेच्या संपर्कात असायचे, असे कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, याविषयी बोलताना साताराचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी म्हणाले, जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात, त्यासंदर्भात डॉक्टरांविरोधात पोलिसांच्या आणि पोलिसांकडून डॉक्टरांच्या तक्रारी झाल्या आहेत. ज्यामध्ये तत्कालीन पीआय यांनी डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. सध्यातरी या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, असे दिसतेय. त्याचा तपास आता सुरू आहे.


