Pune Crime: पुण्यात पाच सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर या तरुणाची पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत आयुषचा जागीच मृत्यू झाला होता आणि राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील काही जणांना अटक केली आहे.
गेल्या वर्षी पुण्यात वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येचा आरोप गणेश कोमकर याच्यावर असून तो सध्या तुरुंगात आहे. याच गणेश कोमकरचा मुलगा म्हणजेच आयुष कोमकर. आरोपानुसार, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने आपल्या नातवाच्या लेकीच्या मुलाची म्हणजेच आयुषची हत्या घडवून आणली. सध्या बंडू आंदेकर पोलिस कोठडीत आहे.
हेही वाचा –
नानापेठेत अवैध बांधकामांवर कारवाई
या प्रकरणानंतर आता पोलिसांनी आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. पुणे महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाना पेठ परिसरातील आंदेकर टोळीची अवैध बांधकामे पाडायला सुरुवात केली आहे. केवळ बांधकामच नव्हे तर टोळीचे अनधिकृत फ्लेक्सदेखील काढण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या स्मृतिस्थळावर उभारण्यात आलेली पाणपोईदेखील गॅस कटरच्या मदतीने हटवली जात आहे.
27 बँक खाती गोठवली
यापूर्वीच पोलिसांनी बंडू आंदेकर व टोळीच्या तब्बल 27 बँक खाती गोठवली होती. संपत्तीचा मागोवा घेताना ही माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिस व महापालिकेच्या संयुक्त कारवाईमुळे आंदेकर टोळीच्या अवैध साम्राज्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.


