सांगली: सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित संस्कृती बचाव मोर्चा दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जोरदार टोला लगावला. यापूर्वी पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अपशब्द वापरल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली होती.
मोर्चात बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट केले की, ‘विधिमंडळात पडळकर यांनी माझ्याबाबत ‘हा बघा आला लांड्याचा’ असे म्हटले. त्यानंतर मी जे बोलायला हवे होते ते बोललो. त्यावेळी त्यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली. जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही,’ असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी गोपीचंद पडळकर यांना दिला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, ‘असेच बोलत राहा, आपल्या ओरिजनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आपण ओरिजनल कसे आहोत हे सर्वांना समजू द्या. तथापी, मोर्चा दरम्यान आव्हाड यांनी स्पष्ट संदेश दिला की, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील संस्कृती आणि मूल्यांची रक्षा करण्यासाठी ठामपणे उभी राहील आणि कोणत्याही प्रकारच्या अपशब्द किंवा आक्रमकतेला चांगला प्रतिसाद देईल.
याशिवाय, मोर्चात आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका करत सांगितले की, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने गोळीच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, हे खेळाडूंच्या कृतीमुळे दहशतवाद्याकडून मारले गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.


