मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री उशिरा औषधांसह अनेक क्षेत्रांवर कर लादण्याची घोषणा केली. औषधांवर १००% कर लादल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसून आला. भारतीय शेअर बाजारावर दबाव आहे. सेन्सेक्स ४१२.६७ अंकांनी घसरून ८०७४७.०१ वर आणि निफ्टी ११५ अंकांनी घसरून २४७७६ वर आला. अमेरिकेत लक्षणीय गुंतवणूक असलेले फार्मा स्टॉक्सही घसरले.
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर अरबिंदो, लुपिन, डीआरएल, सन आणि बायोकॉनसह पाच भारतीय औषध स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अरविंदो फार्मा १.९१% ने घसरून १०७६ वर व्यवहार करताना दिसला. लुपिन शेअर्स जवळजवळ ३ टक्क्यांनी घसरून १९१८.६० वर व्यवहार करताना दिसून आले. सन फार्माचे शेअर्स जवळजवळ ३.८ टक्क्यांनी घसरून १५८० वर व्यवहार करताना दिसले. तर सिप्लाचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले आहेत.
स्ट्राईड्स फार्मा सायन्स ६ टक्के, नॅटको फार्मा ५ टक्के, बायोकॉन ४ टक्के, ग्लेनफार्मा ३.७ टक्के, डिव्हिलॅब ३ टक्के, आयपीसीए लॅब्स २.५ टक्के आणि झायडस लाईफ २ टक्के घसरले. मॅनकाइंड फार्मा देखील ३.३० टक्के घसरला.
सन फार्मामध्ये सर्वात मोठी घसरण
बीएसईच्या टॉप ३० शेअर्समध्ये, सन फार्मामध्ये सर्वात मोठी घसरण झाली, ती ३.८ टक्के घसरली. त्यानंतर इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्ससह २५ शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. उर्वरित पाच शेअर्समध्ये तेजी होती.


