मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होत आहे. अशातच गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्समधील घसरण मंदावली असल्याचे दिसून आले. मात्र, अजूनही रेड झोनमध्ये आहे. गेल्या सात दिवसांत इंडिगोच्या संकटामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले आहे, तिचे मार्केट कॅप ३८००० कोटींहून अधिक घसरले आहे.
इंडिगोला ७ दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स देखील लाल रंगात व्यापार करताना दिसले. या एअरलाईन्सचा शेअर मागील व्यापार दिवशी ९ टक्क्यांनी घसरला. इंडिगोच्या उड्डाण संकटाला सात दिवस उलटून गेले आहेत आणि कामकाज अद्याप सामान्य झालेले नाही. या संकटात प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली असली तरी, इंडिगोच्या शेअर्समधील गुंतवणूकदारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
एका रिपोर्टनुसार, इंडिगोच्या संकटामुळे गेल्या सात दिवसांत त्यांचे शेअर्स १७% पेक्षा जास्त घसरले आहेत आणि त्यांचे बाजारमूल्य १.८९ लाख कोटींवर आले आहे. परिणामी, केवळ सात दिवसांत त्यांचे ४.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. शेअरच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थेट ३८७०८ कोटींची घट झाली आहे.


