नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये येताना दिसत आहे. त्यात आता ओयो ही कंपनी नोव्हेंबरमध्ये त्यांचा ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) दाखल करणार आहे. त्यांचे मूल्यांकन 7-8 अब्ज डॉलर्स (सुमारे ६१,२८६ रुपये) असू शकते. तर या कंपनीचे प्रति शेअर सुमारे ७० रुपये असेल. कंपनीने सुमारे २५-३० पट लक्ष्य ठेवले आहे.
ओयो या कंपनीने यापूर्वी मार्च तिमाहीत संभाव्य आयपीओसाठी बँकर्सशी चर्चा केली होती, जो आयपीओ आणण्याचा त्यांचा तिसरा प्रयत्न होता. यापूर्वी, २०२१ मध्ये सुरू केलेल्या योजना कमकुवत बाजारपेठांमुळे आणि नफा मिळवण्यावर कंपनीचे लक्ष केंद्रित असल्यामुळे विलंबित झाल्या होत्या. कंपनी पुढील आठवड्यात त्यांच्या बोर्डासमोर हा प्रस्ताव सादर करण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, आता कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.
जपानच्या सॉफ्टबँककडे रितेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील गुडगाव-आधारित या स्टार्टअपमध्ये ४०% पेक्षा जास्त हिस्सा आहे. नोव्हेंबरमध्ये नियामकांकडे अर्ज दाखल करण्याचा विचार केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत, सॉफ्टबँकने बाजारातील हालचालींचे मूल्यांकन करण्यासाठी लंडनमधील अॅक्सिस, सिटी, गोल्डमन सॅक्स, आयसीआयसीआय, जेएम फायनान्शियल आणि जेफरीज सारख्या बँकांशी चर्चा केली आहे.
बाजारपेठेतील घडामोडींचे मूल्यांकन केल्यानंतर, त्यांना आता त्यांच्या निर्णयाबद्दल विश्वास आहे. कंपनी पुढील आठवड्यात बोर्डाशी संपर्क साधेल आणि प्रमुख धोरणात्मक घटकांना अंतिम रूप देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.


