नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने-चांदीचे दर अक्षरश: गगनाला भिडत आहे. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. सोने आणि चांदीचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी भारतीय कमोडिटी बाजार बंद होता, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ५००० डॉलर्सच्या पुढे गेले.
मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू झाले तेव्हा, चांदीचे दर अचानक प्रति किलो २५००० रुपयांपेक्षा जास्त झाले. दरम्यान, सोने देखील वाढले, एका झटक्यात प्रति १० ग्रॅम ३७०० रुपयांनी महाग झाले. चांदीची तेजी सुरूच आहे आणि नजीकच्या भविष्यात मंदीचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ट्रेडिंग दरम्यान, ५ मार्च रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीच्या किमतीने प्रति किलो ३५९८०० रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. यापूर्वी, गेल्या शुक्रवारी, चांदीचा भाव ३३४६९९ वर बंद झाला होता आणि ही २५१०१ ची लक्षणीय वाढ दर्शवते.
सोन्याचा दरही वाढताना दिसत आहे. सोन्याचा दर गेल्या शुक्रवारी १५६०३७ वर गेला होता. पण आता हा नवीन दर १५९८२० प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. यामुळे अचानक ३७८३ ची वाढ झाली. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, १ जानेवारीपासून, सोन्याच्या वायदा किमतीत प्रति १० ग्रॅम २४०१६ ने वाढ झाली आहे.


