महाराष्ट्र जागरण डेस्क: सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय. स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘लपंडाव’ मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कृतिका ‘सखी कामत’ हे पात्र साकारणार आहे.
कृतिका देवची लपंडाव ही पहिलीवहिली मालिका. आयुष्यातली पहिली गोष्ट ही नेहमी खास असते. सखी कामत या भूमिकेविषयी सांगताना कृतिका म्हणाली, स्टार प्रवाहसोबतचा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत, मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल, मालिकेची टीम खूपच छान आहे. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल, अशी भावना कृतिकाने व्यक्त केली.


