महाराष्ट्र जागरण डेस्क: ‘दिल ‘, ‘बेटा’, ‘मन’ आणि ‘धमाल’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक इंद्र कुमार सध्या त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले आहे. याचदरम्यान, इंद्र कुमार यांनी ‘राजा’ चित्रपटाची एक आठवण शेअर केली. १९९५ मध्ये इंद्र कुमार यांचा ‘राजा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण, प्रदर्शनानंतर हा चित्रपट फ्लॉप होईल का? याची भीती त्यांना सतावत होती. तसेच त्यातील माधुरीच्या कानशिलात लगावल्याच्या सीनचा खुलासा या मुलाखतीमध्ये केला.
इंद्र कुमार म्हणाले, राजा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊनही मी पुन्हा त्यातील काही सिन्स री-शूट केले होते. कारण या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर जेव्हा मी त्यातील काही सिन्स पाहिले तर ते मलाच समजत नव्हते. त्यामुळे मला माझीच चूक लक्षात आली आणि मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिली. त्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला. पण राजा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांपूर्वी संजय कपूरचा प्रेम हा सिनेमा रिलीज झाला होता. परंतु हा सिनेमा फ्लॉप झाला. पुढे ते म्हणाले, जेव्हा थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेलो तेव्हा संजय कपूरमुळे लोक माझी खिल्ली उडवत होते.
मी पण आशा सोडली होती, तेव्हा माझ्या मनात विचार आला की हा आपला शेवटचा सिनेमा असेल, यानंतर मला थेट हरिद्वारला निघून जावे लागणार आहे. कारण चित्रपट नाही चालला तर आपलं सगळ संपणार आहे. पण खरंच माझे नशीब खूप चांगले होते म्हणून राजा चित्रपट सुपरहिट ठरला. मी जेव्हा नॉव्हेल्टी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहत बसलो होतो, तर तेव्हा लोक संजय कपूरबद्दल बोलत होते. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. ‘राजा’ चित्रपटातील एक सीनबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, ‘राजा’ मध्ये एक सीन होता. ज्यामध्ये माधुरी संजय कपूरचे चित्रपटातील भाऊ परेश रावल यांच्यावर आरोप करते. त्या सीनमध्ये अभिनेता माधुरीच्या कानशिलात लगावतो आणि आपल्या भावाची बाजू घेतो. या एका सीनवर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. तुम जैसी हजारों लडकियां कुर्बान करता हूं अपने भाई पर… या एका डायलॉगवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. ही स्क्रिप्टची ताकद होती, असे त्यांनी सांगितले.


