महाराष्ट्र जागरण डेस्क: आजच्या डिजिटल युगात, लहान मुलांचा स्क्रीनटाईम खूप वाढत चालला आहे. ही एक आता गंभीर समस्या झाली आहे. अगदी लहान बाळांपासून ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या स्क्रीनटाईममुळे मुलं मैदानी खेळ विसरली आहेत. मोबाईल, टीव्ही आणि टॅब्लेटसारख्या साधनांवर अधिक वेळ घालवल्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास देखील होत नाही.
हा पालकांसाठी एक महत्त्वाचा विषय बनला आहे. यामुळे मुलांच्या स्क्रीनटाईमवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण जाणून घेऊयात मुलांचा स्क्रीनटाईम कसा कमी करायचा. मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी मुलांना नवीन खेळांची ओळख करून द्या. चित्रकला, वाचन, संगीत, डान्स किंवा क्राफ्ट यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांना गुंतवून ठेवा. स्क्रीन वापरण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करा, जसे की एका दिवसात १ तास. या वेळेचे पालन करण्यासाठी अलार्म वापरा. या नियमांमुळे मुलं हट्टी देखील होणार नाहीत.
पालकांनी सुद्धा स्क्रीनटाईम कमी करावा. मुलं पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे तुम्ही जे कराल त्याचा परिणाम मुलांवर सुद्धा होतो. मुलांना अभ्यास झाल्यावर बाहेर खेळायला पाठवा. याने मुलांचा शारीरिक विकास होईल. दररोज बाहेर खेळण्यासाठी वेळ ठेवा. सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन यासारखे खेळ मुलांना खेळायला सांगा. संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवा. खेळा, गप्पा मारा, जेवण एकत्र बनवा. त्यांच्या मित्रमंडळींना घरी बोलवा, ज्यामुळे ते सामाजिक कौशल्ये शिकतील, स्क्रिनशी संबंधित कौशल्यांबद्दल त्यांना माहिती द्या आणि त्याचा अतिरेक कसा वाईट आहे हे पटवून सांगा.


