महाराष्ट्र जागरण डेस्क: गरमागरम चहाने सकाळची सुरुवात केली जाते. चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहा पावडर कचऱ्यात फेकून दिली जाते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का? वापरलेली चहापावडर तुम्ही पुन्हा वापरू शकता. चहा पावडरचा योग्य पद्धतीने वापर केल्यास किचनमधील तुमची अनेक कामे सोपी होऊ शकतात. जसे की, स्वयंपाकघराची स्वच्छता, झाडांसाठी खत ते सौंदर्यवाढीसाठी सुद्धा चहा पावडर वापरता येते. जाणून घेऊयात, वापरलेली चहा पावडर साठवायची कशी आणि त्याचा वापर कसा करायचा.
चहा पावडरचा वापर खत म्हणूनही करता येईल. यामुळे खत विकत आणण्यासाठी अधिक पैसे खरेदी करावे लागणार नाहीत. चॉपिंग बोर्डचा वास दूर करण्यासाठी वाळवलेल्या चहा पावडरचा वापर करावा, प्लास्टिकचे डबे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरलेली चहा पावडर वापरू शकता. यासाठी उरलेली चहा पावडर स्क्रबरवर घेऊन त्याने डबे धुऊन घ्यावेत. वाळलेल्या चहा पावडरने तुम्ही लाकडी फर्निचर स्वच्छ करू शकता. यासाठी वाळवलेल्या चहापावडरमध्ये पाणी घालून कापडाने लाकडी फर्निचर पुसून घ्यावे, असे केल्याने फर्निचरला नव्यासारखी चमक येते.
चहा पावडरमध्ये अँटी ऑक्सिडंट असते. चहा पावडरचा वापर जखम झाल्यास किंवा खरचटल्यास करू शकता. यामुळे जखम भरण्यास मदत होते. फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरलेल्या चहा पावडरचा वापर करता येईल. यासाठी तुम्हाला केवळ वाळवलेली चहा पावडर एका पिशवीत भरून फ्रीजच्या एका कोपऱ्यात ठेवायची आहे. या टिप्समुळे फ्रीजमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.


