मुंबई : सध्या मनोरंजन विश्वात अनेक चर्चा सुरु आहेत. ‘साजन’च्या चित्रीकरणादरम्यान माधुरी दीक्षित आणि संजय दत्त डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. संजय आणि माधुरीने इतर अनेक चित्रपटांमध्येही एकत्र काम केले आहे. मात्र, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तच्या अटकेमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, असा दावा आता केला जात आहे.
संजय दत्तला अटक केल्याच्या या घटनेनंतर माधुरी दीक्षितने त्याच्यापासून स्वतःला दूर केले. लेखक हनीफ झवेरी यांचा दावा आहे की, त्यांनी माधुरीला एका पार्टीत संजय दत्तसोबत फोटो काढणे टाळण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. हनीफ झवेरी यांनी स्पष्ट सांगितले की, ही पार्टी संजयच्या अटकेमुळे थांबलेल्या चित्रपटासाठी होती. त्यावेळी संजय जामिनावर होता आणि निर्मात्याने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, जिथे झवेरी हे दोन्ही स्टार्सना एकत्र दाखवू इच्छित होते.
एका मुलाखतीत झवेरी म्हणाले, ‘जेव्हा संजय दत्त तुरुंगात होता तेव्हा चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्याच्या समर्थनार्थ निषेध केला. पण माधुरी दीक्षितने उपस्थित राहण्यास नकार दिला. संजय जामिनावर सुटला तेव्हा महानाटाचे दिग्दर्शक अफजल खान यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. माधुरीने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. ‘मी तिथे होतो. एका बाजूला एक स्टेज होता आणि दुसऱ्या बाजूला काही खुर्च्या असलेले टेबल होते’, असेही झवेरी यांनी मुलाखतीत म्हटले आहे.


