Rishabh Tandon Dies: सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह दिल्लीमध्ये आले होते. या दुर्दैवी घटनेची पुष्टी त्यांच्या माजी टीम सदस्याने केली. त्यांच्या निधनाने कुटुंब आणि जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ऋषभ टंडन हे मुंबईत आपल्या पत्नीसोबत राहत होते, मात्र सणाच्या निमित्ताने ते मूळ गावी परतले होते. सध्या कुटुंबीय अंत्यविधीच्या तयारीत असून, नातेवाईकांच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. त्यांनी या काळात माध्यमांनी आणि चाहत्यांनी गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती केली आहे.
ऋषभ त्यांच्या संगीत कारकिर्दीसोबतच अभिनय क्षेत्रातही सक्रीय होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते अनेकदा चर्चेत आले होते. अभिनेत्री सारा खानसोबतच्या त्यांच्या नात्याच्या अफवांमुळे ते काही काळ मथळ्यांमध्ये होते. एकदा साराचा सिंदूर लावलेला फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा रंगली होती, मात्र साराने नंतर या अफवांना नकार दिला होता.
ऋषभने रशियातील ओलेस्या नेदोबेगोवा हिच्याशी लग्न केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की ओलेस्या उझबेकिस्तानमध्ये त्यांच्या डिजिटल मालिकेची लाईन प्रोड्यूसर होती आणि त्यांची पहिली भेट अगदी योगायोगाने झाली होती. ऋषभ टंडन यांच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली असून, त्यांच्या आवाजाची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण कायम राहील, अशी भावना व्यक्त केली आहे.


