Local Bodies Election: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महायुती यांनी आपले निवडणूक धोरण निश्चित केले आहे. यानुसार, महायुती मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढणार असून इतर महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवेल. मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती पुन्हा एकत्र येईल, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
महायुतीचे हे धोरण मविआ आणि इतर विरोधकांकडून होऊ शकणाऱ्या लाभांना टाळण्यासाठी आखण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष वेगवेगळे लढल्यास मतांचे विभाजन होऊन मविआच्या उमेदवारांना फायदा मिळू शकतो. त्यामुळे महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ठिकाणी महायुती पक्ष स्वतंत्र लढतील आणि निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकत्र येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत संकेत दिले. ते म्हणाले, मुंबईत महायुती एकत्र लढेल, तर इतर भागात रणनीतीनुसार निर्णय घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका हे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठिकाण आहे. मुंबईत महायुतीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या युतीला तोंड देणे हे महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
हेही वाचा –ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
ठाणे महानगरपालिकेतील राजकीय समीकरण
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील स्थिती पाहता 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते, जिथे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावेळी 67 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे फक्त 23 नगरसेवक निवडले गेले. मात्र, आताच्या काळात ठाण्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. त्यामुले ठाण्यात महायुती पक्ष वेगवेगळे लढल्यास स्थानिक पातळीवर तुफान संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.


