मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना ‘पॉवर स्टार’ म्हटले जाते. ही शक्ती केवळ पडद्यावरच दिसत नाही, तर प्रत्यक्षातही त्यांचा स्वभाव तसाच आहे. चित्रपटसृष्टीत आपली शक्ती दाखवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत.
पवन कल्याण हे खऱ्या आयुष्यातील नायक आहेत. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शेती करण्याची त्यांची तयारी होती. त्यांचा जन्म एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोनिदला वेंकट राव आणि आईचे नाव अंजना देवी आहे. पवन कल्याण यांचे खरे नाव कोनिदला कल्याण कुमार आहे. पवन यांचे मोठे भाऊ चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू हे दक्षिणेतील सुपरस्टार आहेत. चित्रपट कुटुंबातील असूनही, पवन कल्याण अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न पाहत नव्हते. शेती करण्याची त्यांचा विचार होता.
लहानपणापासूनच पवन कल्याण यांना अभ्यासात रस नव्हता. ते दहावीपर्यंत अनेक वेळा नापासही झाले. ते कराटेमध्येही तज्ज्ञ होते. त्यांना कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर, त्यांच्या या कौशल्याचा फायदा असा झाला की ते चित्रपटांमध्ये स्वतःचे अॅक्शन करण्यासाठी ओळखला जाऊ लागले. मात्र, येथे पोहोचण्यापूर्वी, पवन कल्याण यांनी असा काळ देखील पाहिला, जेव्हा ते नैराश्येत गेले. त्यांनी लोकांना भेटणेही बंद केले होते. इतकेच नाहीतर त्यांनी पिस्तूलने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.


