मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. शाहरूख खानने त्याचा वाढदिवस त्याच्या जवळच्या मित्रांसोबत साजरा केला. किंग खानचे फॅन्स त्याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत होते. मात्र, त्याने आपली झलक काही दाखवली नाहीच. त्यामुळे फॅन्सची प्रचंड नाराजी झाली.
शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वर ट्विट केले, ‘सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला घराच्या बाहेर न येण्याची विनंती केली होती. कारण, अशाप्रकारे मी आल्यास बाहेर प्रचंड गर्दी होऊन सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर येऊ शकत नाही. त्याबद्दल मनापासून माफी मागतो’, असे शाहरूख खानने म्हटले आहे. तसेच ‘मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यावर विश्वास ठेवा…मी तुम्हाला भेटण्यापेक्षा जास्त मिस करेन. मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आणि माझे प्रेम शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हा सर्वांना प्रेम…’
दरम्यान, शाहरूख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी भेटण्याचे आश्वासन त्याच्या फॅन्सना दिले होते. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता त्याने भेटण्यास नकार दिल्याचे समजते.


