वॉशिंग्टन : आतड्यातील जंतांचा नायनाट करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या एका नवीन गोळीचे (टॅब्लेट) चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दिसले आहेत. जगभरात १.५ अब्ज लोकांना प्रभावित करणाऱ्या या परजीवीच्या उच्चाटनास ही गोळी मदत करू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
आतड्यातील जंतांमुळे कुपोषण होते, तसेच अशक्तपणा येतो. या जंतांत व्हिपवर्म (प्रतोदकृमी) आणि हुकवर्म (अंकुशकृमी) चा समावेश असून, स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष न दिल्या जाणाऱ्या अनेक विकसनशील देशांना या परजीवींचा विळखा पडला आहे. त्यांचा संसर्ग झालेल्यांत बहुतांश करून लहान मुलांचा समावेश असून, यावर स्वच्छतेशिवाय अन्य कोणताही प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध नाही. या जंतांची अंडी असलेल्या मातीने दूषित झालेले अन्न आणि पाण्याच्या माध्यमातून त्यांचा मानवाला संसर्ग होतो.
‘त्या’ देशांसाठी वरदान
मँगो फ्लेवर्ड अर्थात आंब्याच्या चवीची ही गोळी दोन परजीवी प्रतिबंधक औषधांचे मिश्रण आहे. ही दोन्ही औषधे एकत्रित घेतल्याने जंतांपासून मुक्ती मिळते. भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या औषध प्रतिरोध समस्यांवर मात करण्यास तसेच रोगाचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत करू शकणारी ही गोळी या समस्येने त्रस्त देशांसाठी वस्दान ठरेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.


