मुंबई: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात सोमवारी (20 ऑक्टोबर) पहाटे लागलेल्या भीषण आगीत 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील शिवशक्ती नगर भागातील एका मजली चाळीत लागली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4:15 वाजता या चाळीत अचानक आग लागली. पहिल्या मजल्यावरील सुमारे 10×10 फूटाच्या जागेत विद्युत वायरिंग, तीन इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि घरगुती साहित्यामुळे आग भडकली. काही क्षणांतच संपूर्ण खोली धुराच्या लोटांनी भरली.
आगीत चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी यश विठ्ठल खोत (15) यांना पोहोचताच मृत घोषित केले. तर, देवेंद्र चौधरी (30) यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. विराज खोत (13) आणि संग्राम कुरणे (25) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग; 3 डब्बे जळाले, एक महिला प्रवासी जखमी
अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे 4:35 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. सुदैवाने आग इतर चाळींपर्यंत पसरली नाही, मात्र या घटनेत एका निरागस जीवाला जीव गमवावा लागला. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासानुसार विद्युत बिघाड किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमधील दोषामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


