बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती आणि इतर जिल्ह्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अद्याप यादीत कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाकडून या बोगस नावे काढण्यात टाळाटाळ केली जात असल्याचाही दावा गायकवाड यांनी केला आहे.
गायकवाड यांनी सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे कायम आहेत. काही अधिकाऱ्यांची बदली पंधरा वर्षांपूर्वी झाली, तरी त्यांची नावे यादीतून वगळली गेलेली नाहीत. मी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार मतदारांची यादी दिली आहे ज्यांची नावे दोन ठिकाणी आहेत, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा दावीही गायकवाड यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार गायकवाड यांनी दुहेरी नोंदणीचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले काही मतदार शहरी मतदारसंघांमध्ये आपली नावे नोंदवतात. त्यामुळे एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्याने दुहेरी मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहता, बुलढाणा जिल्ह्यात महायुतीची शक्यता वाढत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं, राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित गट) या तिन्ही पक्षांची युती व्हावी, अशी सर्वच नेत्यांची इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युतीबाबत सकारात्मक वातावरण आहे. मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल.
संजय राऊतांवरही टीका
यावेळी आमदार गायकवाड यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचं काम करत आहेत.


