Shantilal Suratwala Death: महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यामध्ये आणखी एक मोठा हादरा बसला आहे. पुणे शहराचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला (७६) यांचे आज पहाटे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने शरद पवार यांनी आपला एक अतिशय विश्वासू आणि निष्ठावान ‘शिलेदार’ गमावला आहे.
पवारनिष्ठ पर्वाचा अस्त
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शांतीलाल सुरतवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीमुळे ते काही काळ पडद्यामागे असले, तरी पुण्याच्या राजकीय नाडीवर त्यांची पकड मजबूत होती. १९९२-९३ च्या काळात त्यांनी पुण्याचे महापौर म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. “मान कापली तरी साहेबांना सोडणार नाही,” ही त्यांची गर्जना राजकारणात आजही चर्चेत असते. काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंतच्या प्रत्येक प्रवासात ते शरद पवारांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले. त्यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणूनही पक्षाची धुरा दीर्घकाळ सांभाळली होती.
बारामतीचा लाडका ‘दादा’ अनंतात विलीन
एकीकडे पुण्यात सुरतवाला यांच्या निधनाचे वृत्त आले, तर दुसरीकडे कालच बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघाताने अख्ख्या महाराष्ट्राला सुन्न केले होते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार पडलेल्या या अंत्यविधीला देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागराचा महापूर लोटला होता. ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.
पक्षासमोर नेतृत्वाचे गंभीर संकट
एकाच आठवड्यात राष्ट्रवादीने दोन महत्त्वाचे स्तंभ गमावले आहेत. प्रशासनावर पकड असलेले अजित पवार आणि पुण्यात पक्ष रुजवणारे शांतीलाल सुरतवाला यांच्या एकामागून एक जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुहेरी आघातातून सावरून आगामी काळात पक्ष बांधणीचे मोठे आव्हान आता शरद पवारांसमोर असणार आहे.


