Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असतानाच लातूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसीतील त्रुटींमुळे लातूरमधील तब्बल 61 हजार महिलांचा लाभ बंद झाला असून, गेल्या दोन महिन्यांपासून या महिलांना मानधन मिळालेले नाही.
परिणामी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे ३ हजार रुपये अनेक लाभार्थींना मिळालेले नाहीत. लातूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 67 हजार 459 महिला लाभार्थी असून, त्यातील मोठ्या संख्येने महिलांना ई-केवायसी करताना झालेल्या चुकांचा फटका बसला आहे.
शासकीय नोकरी असल्याचा पर्याय चुकून निवडणे, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याची नोंद, तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे, ही लाभ थांबण्यामागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
दरम्यान, या महिलांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. आजपासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असून, पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत अनेक लाडक्या बहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.


