Pune Mayor : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा अखेर मुहूर्त निश्चित झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पार पडेल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र आता प्रशासकीय हालचालींनंतर ६ फेब्रुवारी २०२६ ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रिया
महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम निश्चित केला आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेची पहिली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची अधिकृत निवड केली जाईल. यंदा पुण्याच्या महापौरपदाची माळ ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव असल्याने, भाजपमधील कोणत्या महिला नगरसेविकेला ही संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्तेची समीकरणं आणि इच्छुकांची गर्दी
महापौरपद महिलेसाठी राखीव असल्याने भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, त्यासोबतच उपमहापौर आणि विरोधी पक्षनेता या पदांसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. उपमहापौर पदासाठी भाजपमधून गणेश बीडकर, धीरज घाटे आणि श्रीनाथ भिमाले या अनुभवी नेत्यांची नावे चर्चेच्या आघाडीवर आहेत. तथापी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या अनुभवी चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहे.
प्रशासकीय हालचालींना वेग
यापूर्वी २६ जानेवारीनंतर लगेचच ही प्रक्रिया राबवण्याचे संकेत महापालिकेने पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र, नियोजित बदलांनुसार आता ६ फेब्रुवारीला शहराचा नवा ‘प्रथम नागरिक’ निवडला जाईल. भाजप सत्ता राखण्यासाठी कोणावर विश्वास टाकणार आणि विरोधक काय रणनीती आखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


