Municipal Corporation Reservation: राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज अखेर जाहीर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही प्रक्रिया पार पडली. राज्यातील 29 महापालिकांपैकी 15 ठिकाणी ‘महिला राज’ येणार असून उर्वरित 14 ठिकाणी पुरुषांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी (General) राहिल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
महिलांना झुकते माप
दरम्यान, ५० टक्के आरक्षण नियमानुसार 15 महापालिकांचे नेतृत्व महिलांकडे असेल. यामध्ये 4 ओबीसी महिला आणि 9 खुल्या प्रवर्गातील महिलांचा समावेश आहे. मुंबई (BMC) आणि पुणे महापालिकेत महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने दिग्गज नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच ठाणे महापालिकेत अनुसूचित जाती (SC) तर कल्याण-डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
२९ महापालिकांचे आरक्षणाचे सविस्तर
1 बृहन्मुंबई (BMC) – सर्वसाधारण
2 ठाणे – अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई – सर्वसाधारण
5 वसई-विरार – सर्वसाधारण
6 भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण- महिला
7 मीरा-भाईंदर – सर्वसाधारण
8 उल्हासनगर – ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे – सर्वसाधारण
10 पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण- महिला
11 नागपूर – सर्वसाधारण
12 अहिल्यानगर -ओबीसी- महिला
13 नाशिक- सर्वसाधारण
14 छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण
15 अकोला- ओबीसी-महिला
16 अमरावती- सर्वसाधारण
17 लातूर- अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा- सर्वसाधारण
19 चंद्रपूर- ओबीसी- महिला
20 धुळे- सर्वसाधारण
21 जळगाव- ओबीसी- महिला
22 मालेगाव- सर्वसाधारण
23 कोल्हापूर- ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड- सर्वसाधारण
25 सोलापूर- सर्वसाधारण
26 इचलकरंजी- ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना- अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल -ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी- सर्वसाधारण
निवडणुकीची पार्श्वभूमी
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाले. मुंबई वगळता इतर सर्व ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग रचना (4 सदस्यीय प्रभाग) लागू होती. मतदानाची आकडेवारी पाहता परभणीत सर्वाधिक 66 टक्के तर मुंबईत 52.94 टक्के इतकी नोंद झाली आहे. या आरक्षण सोडतीवेळी भाजपचे राजेश शिरवडकर, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांसारख्या प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.


