Pune Politics: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या नियुक्तीबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार नाही, असे संकेत मोहोळ यांनी दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या एकूण १० जागा आहेत. पक्षीय बलाबलानुसार त्याचे विभाजन खालीलप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे:
भाजप: ७ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस: २ जागा
काँग्रेस: १ जागा
भाजपच्या वाट्याला आलेल्या ७ जागांसाठी चक्क शेकडो इच्छुक शर्यतीत आहेत. विशेषतः निवडणुकीत पराभूत झालेले ४६ उमेदवार या पदासाठी ‘फिल्डिंग’ लावत आहेत.
मुरलीधर मोहोळांचा ‘निवडणूक फॉर्म्युला’
पुणे श्रमिक पत्रकार संघातील एका कार्यक्रमात बोलताना मोहोळ म्हणाले की, “ज्या सक्षम कार्यकर्त्यांना काही कारणास्तव निवडणुकीत उमेदवारी देता आली नाही, केवळ त्यांचाच विचार या पदासाठी केला जाईल.” त्यांच्या या विधानामुळे ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. सुमारे २० ते २५ निष्ठावंत आणि सक्षम कार्यकर्ते सध्या या शर्यतीत आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेत्यांच्या निवास्थानी समर्थकांची मांदियाळी
स्वीकृत पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी आता दबाव गट तयार करण्यास सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या दोन्ही बड्या नेत्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची प्रचंड गर्दी होत आहे. भाजपकडे असलेल्या ७ जागांवर पूर्ण पाच वर्षांऐवजी अडीच-अडीच वर्षांसाठी दोन व्यक्तींना संधी देण्याची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास एकूण १४ जणांचे पुनर्वसन करणे शक्य होईल.
उमेदवारीवेळची कसरत
निवडणुकीच्या वेळी तिकीट वाटप करताना १८०० इच्छुकांमधून १६५ जणांची निवड करताना भाजपच्या नेतृत्वाची मोठी दमछाक झाली होती. त्यावेळी ज्या कार्यकर्त्यांना ‘समन्वयक’ म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते, त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेकडो अर्जांमधून केवळ ७ (किंवा १४) नावे निश्चित करताना पक्षाची मोठी कसरत होणार आहे. दरम्यान, पुण्यात निष्ठावान पण संधी हुकलेले कार्यकर्ते विरुद्ध पराभूत उमेदवार असा संघर्ष आता भाजपमध्ये उघडपणे पाहायला मिळत आहे.


