Sanjay Raut on Congress: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये संभाव्य युतीबाबतची चर्चा वेग घेत आहे. या चर्चेमुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असताना, आज काँग्रेस नेते भाई जगताप यांनी स्पष्ट विधान करत या चर्चेला वेगळं वळण दिलं आहे. भाई जगताप यांनी सांगितले, ‘राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे, आम्ही कोणत्याही शिवसेनेसोबत आघाडी करून निवडणूक लढवणार नाही. मी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असताना हीच भूमिका घेतली होती आणि आजही त्यात कोणताही बदल नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.’
काँग्रेसने इतिहास लक्षात ठेवावा – राऊतांचा पलटवार
काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण काय भूमिका घेतं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही कधीही मित्र पक्षांना अडचणीत आणणारा निर्णय घेणार नाही. राज ठाकरे हे स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे जर कोणी भूमिका घेत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आमचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे आणि मुंबईला अडाणींच्या घशात जाण्यापासून वाचवायचं आहे.’
संजय राऊत पुढे म्हणाले, मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जननी आहे. त्या काळात सर्व पक्ष एकत्र आले होते. आजही तसाच काळ परत आलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. राऊत यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करत विचारलं, बिहारमध्ये राज ठाकरे आहेत का? तिथे तेजस्वी यादव आणि काँग्रेस वेगवेगळ्या निवडणुका लढतात. तिथे उद्धव ठाकरे आहेत का? मग मुंबईत इतका आक्षेप का? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मराठी माणसाच्या हातात राहणं आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसमधील मराठी नेतृत्वाने या संकटाचा गंभीर विचार करावा.
लोकशाही वाचवण्याची लढाई
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, ‘आमची लढाई ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे. आम्ही एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढत आहोत. त्यात काँग्रेसलाही आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, डावे पक्ष सगळे एकत्र येत आहोत. हे सत्तेसाठी नव्हे, तर लोकशाहीसाठी आहे.
आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता – संजय राऊत
राऊतांनी पुढे स्पष्ट केलं, इंडिया ब्लॉक स्थापन करताना आमचं ध्येय राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं होतं. आम्ही कधीच म्हणालो नाही की आमच्याच पक्षाचा पंतप्रधान असावा. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आमचं मन मोठं आहे आणि आम्ही त्यांना पाठींबा देतो. पण मुंबई महापौराच्या मुद्द्यावर एवढा वाद का? काँग्रेसने देशभर 27 महापौर करावेत, आम्हाला काही हरकत नाही. मात्र मुंबईचा महापौर मराठी असावा, हीच आमची भूमिका आहे.


