पुणे: शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा थेट आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणात ठाकरे गटानेही उडी घेतली असून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोहोळ यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
मोहोळ सत्तेचा गैरवापर करत आहेत – अंबादास दानवे
पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले, ‘रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. ज्या जैन समाजाच्या हॉस्टेलच्या जमिनीबाबत वाद निर्माण झाला आहे, त्या प्रकरणात एका बिल्डरसोबत मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. सत्तेच्या जोरावर कुणीही सामान्य लोकांच्या हक्काच्या जमिनी बळकावू नयेत.’ त्यांनी पुढे भाजपवरही टीका करत म्हटलं, मोहोळ हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत. हे थांबले पाहिजे.
ताज हॉटेल वादावरही प्रतिक्रिया
दरम्यान, दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये उद्योजिका श्रद्धा शर्मा यांना कोल्हापुरी चप्पल घातल्यामुळे दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ती महाराष्ट्राची मुलगी आहे आणि तिने आपल्या परंपरेचा अभिमान बाळगला. तिच्याशी झालेलं वर्तन चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या मुलींनीसुद्धा अशा ठिकाणी अभिमानाने कोल्हापुरी चप्पल घालून जावं. आपली संस्कृती ही लाजण्याची नाही, दाखवण्याची आहे.’
महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर दानवेंचा टोला
तथापी, अभिनेते महेश कोठारे यांनी अलीकडेच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात भाजप म्हणजे माझं घर, मी मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यावर अंबादास दानवे म्हणाले, आजकाल काही जणांना स्टेजवर जाऊन लोणी लावण्याची सवय झाली आहे. कोठारे हे उत्तम कलाकार आहेत, पण जर ते एखाद्या राजकीय पक्षाचं समर्थन करत असतील, तर जनतेला तेही लक्षात राहील. कलाकारांनी कलाक्षेत्रात राहून समाजासाठी भूमिका घ्यावी, पण राजकारणात रंग मिसळला की त्याची जबाबदारीही घ्यावी लागते.


