Eknath Shinde: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. मुंबईत पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील सर्व ६ लोकसभा मतदारसंघांसह ठाणे जिल्ह्याची धुरा आता अधिकृतपणे श्रीकांत शिंदे यांच्याकडे असणार आहे.
४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ‘फील्डिंग’ सज्ज
निवडणुकीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेने राज्यभरातील सर्व 48 लोकसभा जागांसाठी ‘संपर्क प्रमुखां’ची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईतील सहा जागांची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवून पक्षाने आपला इरादा स्पष्ट केला आहे. मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई दक्षिण या सर्व मतदारसंघांत श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना काम करेल. त्यांच्या मदतीला मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
ठाणे आणि कल्याणमध्येही खांदेपालट
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणूनही डॉ. श्रीकांत शिंदे यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, भिवंडी आणि कल्याण या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांसाठी खासदार नरेश म्हस्के यांची ‘संपर्क प्रमुख’ म्हणून निवड करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे, तर कोल्हापूर, मावळ आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात ‘हे’ दिग्गज सांभाळणार धुरा
पक्षाने भौगोलिक समतोल राखत अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवले आहे. नागपूरची जबाबदारी माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे, तर चंद्रपूरसाठी आमदार कृपाल तुमाने यांची निवड झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगरसाठी विलास पारकर आणि जालन्यासाठी खासदार संदिपान भुमरे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतील. बुलढाण्यात संजय सोनार, तर अकोल्यात माजी आमदार राजन साळवी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.


