Pune IT Job Scam: विद्येचे माहेरघर आणि आयटी हब असलेल्या पुण्यात नोकरीच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पैसे भरा आणि आयटीत नोकरी मिळवा’ अशा प्रलोभनाला बळी पडलेल्या तरुणांना आता ना नोकरी मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
कसा रचला फसवणुकीचा सापळा?
पुण्यातील QuantumSoft Technologies, Flynaut SaaS आणि DataTech Labs यांसह सुमारे १० कंपन्यांवर फसवणुकीचे आरोप आहेत. हायरिंग कन्सल्टंट्सच्या माध्यमातून तरुणांना ६ ते ११ लाखांचे वार्षिक पॅकेज देण्याचे आमिष दाखवले जायचे. यासाठी उमेदवारांकडून दीड ते साडेतीन लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून उकळले जात होते.
पीडितांची आपबिती
यवतमाळचा धृव: २०२२ मध्ये पदवीधर झालेल्या धृवने नातेवाईकांकडून कर्ज काढून ३ लाख रुपये भरले. ऑक्टोबर २०२५ मध्ये जॉईन झालेला धृव आता रस्त्यावर आला आहे.
श्रृष्टीची कहाणी: ११ लाखांच्या पॅकेजसाठी तिने २.७५ लाख रुपये भरले. एक महिना काम केल्यावर पगार बंद झाला आणि पैसे परत मागितल्यावर तिला राजीनामा देण्यास भाग पाडले गेले.
तपासातील धक्कादायक माहिती
हिंजेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या खात्यात पैसेच नव्हते. नवीन कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेले पैसे आरोपींनी स्वतःचे दागिने, आलिशान गाड्या आणि घरे खरेदी करण्यासाठी वापरले. Flynaut चे सीईओ उपेश पाटील आणि संचालक रोहन आंबुलकर सध्या कोठडीत आहेत, तर QuantumSoft चे निखिलेश्वर क्षीरसागर यांनाही अटक करण्यात आली आहे.
डेटाटेक लॅब्सवरील आरोप
बावधन येथील डेटाटेक लॅब्समध्येही ६० हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार अडकले असून, पगार मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उलट ‘डेटा चोरी’चे खोटे आरोप लावून त्यांना धमकावले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, कंपनीचे सीईओ अमित आंद्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आयटी कर्मचारी संघटना FITE ने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असून, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांना टार्गेट करणाऱ्या या रॅकेटमधील ३० हून अधिक कन्सल्टंट्सवर कारवाईची मागणी केली आहे. एसआयटी स्थापन झाल्यामुळे आता या घोटाळ्याचे धागेदोरे किती खोलवर आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.


