Ravindra Waikar Building Fire: मुंबईत दिवाळीच्या रात्री मोठी दुर्घटना टळली आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) खासदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या इमारतीच्या 22 व्या मजल्यावर दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर वायकर यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इमारतीच्या फायर सिस्टिममध्ये पाणीच नसल्याचे लक्षात येताच त्यांनी संताप व्यक्त केला.
फायर सिस्टिम ठप्प; खासदारांचा संताप
आग लागल्याची माहिती मिळताच वायकर तत्काळ इमारतीत पोहोचले. तेथे फायर सिस्टिम कार्यरत नसल्याचे पाहून त्यांनी इमारत व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. वायकर म्हणाले, नवीन इमारतीतच जर फायर सिस्टिम बंद असेल, तर इतर इमारतींचे काय? मुंबईतील प्रत्येक इमारतीची फायर सिस्टिम कार्यरत आहे का, याची महापालिका आणि फायर ब्रिगेडने तपासणी केली पाहिजे, अशी मागणी केली.
यंदाच्या दिवाळीत मुंबई शहरात रॉकेट आणि फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वायकर म्हणाले की, घातक फटाक्यांवर कारवाई व्हायला हवी. मी लोकसभेत या विषयावर आवाज उठवणार आहे. तसेच त्यांनी नागरिकांना दिवाळी सुरक्षित आणि जबाबदारीने साजरी करण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे, रवींद्र वायकर यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाबाबत बोलताना वायकर म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्रात जशी दिवाळी साजरी होते, तशीच दिल्लीमध्येही मराठी पद्धतीने दिवाळी व्हावी, हा हेतू होता. त्यामुळे मी ‘दिवाळी पहाट’ आयोजित केली.


