Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना त्यांचे चार्टर्ड विमान शेतात कोसळले. या दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी ‘DGCA’ ने केली आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांच्या अशा जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद घटनेनंतर, त्यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या त्यांच्या अफाट संपत्तीची आणि गुंतवणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
आर्थिक साम्राज्य: रोख रक्कम आणि बँक ठेवी
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्याकडे मोठी जंगम मालमत्ता आहे.
- अजित पवार: त्यांच्याकडे ७.२० लाख रुपये रोख असून बँकेत सुमारे ३.९६ लाख रुपये जमा होते.
- सुनेत्रा पवार: सुनेत्रा वहिनींकडे ६.६५ लाख रुपये रोख आणि विविध बँकांमध्ये सुमारे ३.७० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
शेअर्स आणि विम्यातील मोठी गुंतवणूक
अजित पवारांचे गुंतवणुकीचे गणित अत्यंत चोख होते. त्यांनी शेअर्स आणि सरकारी योजनांमध्ये मोठा निधी गुंतवला होता:
- शेअर्स: विविध कंपन्यांमध्ये त्यांचे सुमारे ८.५० कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.
- विमा व पोस्ट: १०.७९ कोटींहून अधिक रक्कम त्यांनी आयुर्विमा आणि पोस्टाच्या योजनांमध्ये सुरक्षित केली होती.
- सुनेत्रा पवार: त्यांनीही विमा योजनांमध्ये सुमारे ४४.२९ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दागिने आणि आलिशान वाहने
पवार कुटुंबाकडे असलेल्या मौल्यवान वस्तूंची व्याप्ती मोठी आहे. अजितदादांना शेतीची आणि गाड्यांची विशेष ओढ होती.
- मौल्यवान धातू: अजित पवारांकडे ४१.५० किलो चांदी (मूर्ती व भांडी) होती. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे १.३० किलो सोने, ३५ किलो चांदी आणि २८ कॅरेटचे हिरे (किंमत ३८ लाखांहून अधिक) आहेत.
- गाड्यांचा ताफा: त्यांच्याकडे टोयोटा कॅमरी, होंडा सीआरव्ही यांसारख्या आलिशान गाड्यांसह शेतीसाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलरचा संच होता.
स्थावर मालमत्ता आणि कर्ज
अजित पवारांची स्थावर मालमत्ता गेल्या पाच वर्षांत १० कोटींनी वाढून ३७.१५ कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्यांच्या नावावर २० ठिकाणी शेतजमीन, ४ निवासी इमारती आणि १ व्यावसायिक संकुल आहे. संपत्ती कोट्यवधींच्या घरात असली तरी त्यांच्यावर कर्जाचा बोजाही होता.


