Eknath Shinde on Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा आज विमान अपघातात अंत झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्याला अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या प्रशासनावरची एक मजबूत पकड निसटली आहे,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
‘निर्णयक्षम आणि निर्भय नेतृत्व’
अजित पवारांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना शिंदे म्हणाले की, दादांसारखा स्पष्टवक्ता आणि निर्भय नेता शोधून सापडणार नाही. मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “कोणत्याही फाईलचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ते निर्णय घेत नसत. त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्य हे नवीन राजकारण्यांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. कठीण प्रसंगात डगमगून न जाता ठामपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती आम्हाला नेहमीच बळ द्यायची.”
प्रशासकीय सुधारणांचा ‘पॉवर’फुल चेहरा
एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवारांनी दुष्काळमुक्ती आणि जलव्यवस्थापन मोठे काम केले. निर्णयप्रक्रियेत विलंब त्यांना कधीच मान्य नसे. स्पष्टता आणि वेग हीच त्यांची ओळख होती. शेतकरी प्रश्न असोत की सहकार क्षेत्र, प्रत्येक विषयावर त्यांची पकड थक्क करणारी होती.
विरोधकही झाले नतमस्तक
अजित पवारांच्या कार्यपद्धतीची दखल केवळ मित्रपक्षांनीच नव्हे, तर विरोधकांनीही घेतली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विमान अपघातात दादांसोबत प्राण गमावलेल्या इतर सदस्यांप्रतीही शिंदे यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.


