Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय नेत्यांचा विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताच्या राजकीय इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांनी अशाच भीषण अपघातांमध्ये आपले प्राण गमावले आहेत.
विमान अपघातात प्राण गमावलेले प्रमुख नेते:
- संजय गांधी (१९८०): माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र आणि तरुण नेते संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ विमान कोसळून मृत्यू झाला होता.
- माधवराव सिंधिया (२००१): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळ खाजगी विमान कोसळून निधन झाले.
- जी.एम.सी. बालयोगी (२००२): लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
- विजय रुपाणी: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात २४२ प्रवाशांपैकी केवळ एक जण वाचला होता.
- ओ.पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग (२००५): हरियाणाचे मंत्री ओमप्रकाश जिंदाल आणि सुरेंद्र सिंग यांचे २००५ मध्ये सहारनपूर येथे हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले.
- वाय.एस. राजशेखर रेड्डी (२००९): आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते.
- जनरल बिपिन रावत (२०२१): भारताचे पहिले संरक्षण प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


