पुणे: रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयात विविध सुधारणा राबविण्यात आल्या आहेत. त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. अपघात विभागात गंभीर रुग्णांना तत्काळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत तसेच नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. त्यात तातडीने सेवा देणे अंमलात आणल्या आहेत.
ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण दाखल होतात. विशेषतः त्यात सर्वाधिक रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असतात. आत्तापर्यंत ससूनमध्ये “रुग्णसेवा हाच धर्म” या तत्त्वावर आधारित अनेक उपक्रम सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर अपघात विभागातील सेवेचे दर्जात्मक सक्षमीकरण करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना तत्काळ तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे यासाठी अपघात विभागात सहयोगी प्राध्यापक डॉक्टरांची रात्रपाळीमध्ये नियमित नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेत वेग येऊन अपघाताच्या रुग्णांचे जीव वाचविण्यात अधिक सहाय्य होईल.
रुग्ण व नातेवाईकांच्या अडचणी त्वरित सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व निवासी डॉक्टर यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवा अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


