MPSC Exam Date Changed: महाराष्ट्रात मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यातील परीक्षार्थींनी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आता परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले गेले आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरला राज्यातील 37 जिल्हा केंद्रे आणि 524 उपकेंद्रांवर परीक्षा होण्याचे नियोजन होते. मात्र, पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक गावांचा आणि तालुक्यांचा संपर्क तुटला होता, तसेच हवामान खात्याने येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थ्याला परीक्षेतून वंचित राहू नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCला पत्र लिहून 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यांनी सांगितले की राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि येत्या दिवसांतील पावसाचा अंदाज पाहता, परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी नवीन तारीख निश्चित करणे आवश्यक आहे.
याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. MPSCने या सर्व परिस्थितीचा विचार करून सुधारित तारीख 9 नोव्हेंबर 2025 निश्चित केली आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सुधारित दिनांक स्वतंत्र पत्रकाद्वारे जाहीर केला जाईल.


