पुणे: संगणकीकृत सातबारा व आठ अ उतारा तसेच हस्तलिखित प्रत मिळवण्यासाठी सरकारी शुल्काबाहेर अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या तीन महिला तलाठींवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या तीनही तलाठींना लाच स्वीकारताना तात्काळ पकडण्यात आले असून, त्यांच्या घरांमध्ये झाडाझडती सुरु आहे.
तीनही तलाठी पश्चिम हवेली भागातील असून, त्यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तलाठी सांगरूण, बहुली आणि खडकवाडी-कुडजे गावांच्या रहिवासी आहेत. या प्रकरणाची तक्रार जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
हेही वाचा – Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या
तक्रारदारांनी सांगितले की, पुणे शहराच्या प्रस्तावित रिंग रोडजवळील जमिनीच्या सातबारा व आठ अ उतारांच्या संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत त्यांना हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी संबंधित गावातील तीन तलाठ्यांना भेट दिली होती. मात्र, तलाठ्यांनी सरकारी शुल्काबाहेर सुमारे 2,000 ते 12,000 रुपये लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारांच्या माहितीवरून तीनही महिला तलाठ्यांना लाच घेताना पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या प्रकरणाची तपासणी करत आहेत.
कारवाई करण्यात आलेल्या महिला तलाठ्यांची माहिती
- शारदादेवी पुरूषोत्तम पाटील (वय 40, तलाठी खडकवाडी-कुडजे, हवेली, रा. ठि. सर्व्हे न. 57/1, कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे)
- प्रेरणा बबन पारधी (वय 30, तलाठी सांगरूण, हवेली, रा. ठि. फ्लॅट न. 7s, 2/4A, जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण, पुणे)
- दिपाली दिलीप पासलकर (वय 29, तलाठी बहुली, हवेली, रा. ठि. लेन न.4, स्वामी समर्थनगर, कोंढवा, काकडेनगर, पुणे 48)
या प्रकरणामुळे गावातील जमीन व्यवहार आणि सरकारी कार्यालयातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ कारवाई करत प्रकरण गंभीरतेने हाताळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


