China Earthquake: चीनच्या नैऋत्य भागाला सोमवारी पहाटे निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. ग्वांग्शी प्रांतातील लिउझोऊ शहरात झालेल्या ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मोठी पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २ जणांचा बळी गेला असून, एक व्यक्ती बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
युद्घपातळीवर बचाव कार्य आणि स्थलांतर
भूकंपाचा तडाखा इतका तीव्र होता की, शहरातील १३ इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले असण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. धोक्याची तीव्रता ओळखून प्रशासनाने बाधित क्षेत्रातील सुमारे ७,००० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. या घटनेत ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागरी सेवा सुरक्षित, मात्र रेल्वेला फटका
भूकंपानंतरही दिलासादायक बाब म्हणजे शहरातील वीज, पाणी आणि गॅस यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. विशेषतः रेल्वे रुळांना किंवा पुलांना तडे गेले आहेत का, याची तांत्रिक तपासणी करण्यासाठी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. या तपासणीमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.


