पुणे : वाघोली परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत सुविधांच्या गंभीर समस्येमुळे या भागात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असा प्रस्ताव पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
आयुक्त राम यांनी बुधवारी वाघोली आणि परिसरातील सांडपाणी व्यवस्था व रस्त्यांची पाहणी केली. या वेळी नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवून रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचऱ्याच्या समस्या मांडल्या. या भागातील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेच्या मूलभूत अडचणी दूर केल्याशिवाय नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली.
हेही वाचा –Pune Crime : वाघोलीत तडीपार गुंडाना खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी पिस्टलसह ३ राउंड जप्त
आयुक्तांच्या पाहणीत लोणीकंद रस्ता, वायफ रस्ता, भवडी रस्ता, फुलमाळ रस्ता, नकोरी रस्ता अशा विविध ठिकाणांचा समावेश होता. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अनिरुद्ध पावलस्कर आणि परिमंडळ अधिकारी माधव जगताप उपस्थित होते. नवलकिशोर राम म्हणाले, ‘या भागातील पाणीपुरवठा आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट आहे. पीएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानग्या दिल्या गेल्या आहेत. मात्र आवश्यक पायाभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असे शासनाला कळविण्यात येईल.
आयुक्तांनी पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कळस, घोले आणि धानोरी या भागातील नागरिकांच्या तक्रारींचाही आढावा घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.


