पुणे: पुण्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारचा अपघात घडला, ज्यामध्ये त्यांच्या कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते डीसीपींना गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासंदर्भात फोनवरून सूचना देताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण रिक्षाचा अपघात झाला असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. जखमी रिक्षाचालकाला भरीव मदत आणि वैद्यकीय खर्चाची व्यवस्था व्हायला हवी. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे योग्य नाही. महिला, गरीब, सामान्य माणसांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठीच मंत्र्यांनी फोन करायला हवा, न कि निरपराधांवर दबाव आणायला.’
हेही वाचा – राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं संभाव्य वेळापत्रक
या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) चे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन तपासाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी पुरावे आणून द्यायला वेळ घेऊ नये, तपास वेगाने आणि व्यवस्थित करा. रिक्षाचालक गरीब माणूस आहे, त्याला न्याय मिळायला हवा. आतापर्यंत या प्रकरणासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिस तपास सुरू असून, अपघाताची खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी चौकशी जोरात सुरू आहे.


