CNG Price Hike: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या किमतींमध्ये वाढ केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपासून दर प्रति किलो 1 रुपयांनी वाढवण्यात आला असून, नवीन दर 90.75 रुपये प्रति किलो इतका लागू झाला आहे.
एमएनजीएलच्या निवेदनानुसार, सीएनजी विभागासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही वाढ किरकोळ असली तरीही सीएनजी हे इतर इंधनांच्या तुलनेत अजूनही किफायतशीर पर्याय ठरते. एमएनजीएलने सांगितले की, वाढीनंतरही सीएनजीचा वापर पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 47 टक्के, डिझेलच्या तुलनेत 24 टक्के आणि ऑटोरिक्षा चालकांसाठी सुमारे 25 टक्के बचत देतो. त्यामुळे वाहनचालकांना इंधनखर्चात मोठा फरक जाणवतो.
हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता
दरम्यान, एमएनजीएलने स्पष्ट केले आहे की घरगुती पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू (पीएनजी) याच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना याचा फटका बसणार नाही. दरवाढीमुळे खासगी वाहनधारक, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असली, तरी कंपनीच्या मते दरवाढ आवश्यक होती. एमएनजीएलने नागरिकांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधन म्हणून सीएनजीचा वापर सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.


