Pune News: गुंड निलेश घायवळ प्रकरण सध्या चांगलच तापलं आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. घायवळ प्रकरणावर लक्ष न देता गौतमी पाटील अपघात प्रकरणाची चंद्रकांत पाटलांनी दखल घेतल्याने रोहित पवार चंद्रकांत पाटलांवर चिडले. रोहित पवार यांनी चंद्रकांत दादांवर जोरदार टीका केली. यावर भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त केला आहे. “घायवळ प्रकरणात मी काय केलं हे सांगत फिरू का?” “तू तुझी पत सांभाळून राहा” अशा शब्दांत ते रोहित पवारांवर भडकले.
काय म्हणाले होते रोहित पवार?
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील नामचीन गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून गेला, तरी चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले नाही. मात्र, अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. पाटील यांनी अशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणणे योग्य नाही”
चंद्रकांत पाटीलांच प्रत्युत्तर
पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांना रोहित पवारांच्या या टिप्पणीबाबत विचारलं असताना ते चांगलेच संतापले. म्हणाले, “रोहित पवारला काय काम धंदा आहे का? तो लगेच नेता व्हायला चालला आहे. तू तुझी पत सांभाळून राहा. मला रोहित पवारने शिकवावं एवढी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही”
घायवळ प्रकरणात मी काय केलं हे सांगत फिरू का? त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस विनाकारण निघाली का? असं स्पष्टीकरणही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावरील आरोपांना दिलं. तसंच रोहित पवारांना प्रत्येक प्रकरणात ढोल वाजवण्याची सवय आहे, आम्हाला तशी नाही असा टोलाही त्यांनी लगावला.


