लोहगाव: कळस, धानोरी, लोहगाव येथील नागरी रस्ते, पाणी, कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त होऊन आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन केले. या समस्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही प्रश्न सुटत नसल्याने, पुजा धनंजय जाधव यांच्यावतीने पुणे मनपाचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या गाडीच्या समोर लोटांगण आंदोलन करण्यात आले.
धक्कादायक माहिती अशी की, पुणे महानगरपालिकेने 2008 साली बनविलेल्या डीपी प्लॅननुसार आखण्यात आलेल्या रस्त्यांची कामे 15 वर्षां नंतरही पुर्ण झालेली नाहीत. त्यामुळे तात्काळ डीपी रस्त्यांची अपुर्ण कामे पुर्ण करून, डीपी रस्ते चालू करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. यात कळस, धानोरी, लोहगाव मधील रस्त्यांचा समावेश आहे. मुख्य रस्ता व सिमेंट रस्ता वगळता, उर्वरित सर्वच रस्त्यांची चाळण झालेली आहे. निवेदने दिल्यानंतर डागडुजी करण्यात येते परंतु त्यामुळे अधिकच समस्या वाढत असून, रस्त्यांवर खड्डे वाढत चालले आहेत. परिणामी पावसाळ्यात यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून, दररोज किमान 100 ठिकाणी कचरा साचत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. साठे वस्ती, निंबाळकर नगर, मोझे नगर, पोरवाल रोड या भागामध्ये पिण्याचे पाणी २ दिवसांआड येते. पाण्याची लाईन टाकून झालेली असताना सुद्धा पाणी सोडले जात नाही. त्यामुळे पाण्याची समस्या वाढत आहे.


