Bacchu Kadu: प्रहार जनशक्ती पक्षाचे फायरब्रँड नेते बच्चू कडू यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांना ‘अपघातात’ संपवण्याचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
घातपाताचा ‘प्लॅन’ आणि पेनड्राईव्हचे गुपित
तक्रारदार अभिजित तायडे यांच्या दाव्यानुसार, बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांनी मिळून त्यांना जीवे मारण्याचे कारस्थान रचले होते. हा केवळ योगायोगाने झालेला अपघात वाटावा, अशा पद्धतीने हत्येचे नियोजन करण्यात आले होते. तायडे यांनी पोलिसांकडे एक पेनड्राईव्ह सोपवला असून, त्यात या कटाशी संबंधित कथित संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचे समजते. संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी हा पेनड्राईव्ह फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे.
अचलपूरचा राजकीय संघर्ष टोकाला
बच्चू कडू आणि तायडे कुटुंबातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील याच वर्चस्वाच्या लढाईतून हा टोकाचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 55, 58 आणि 61 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.
तपासाचे चक्र वेगाने सुरू
“मला जाणीवपूर्वक टार्गेट करून संपवण्याचा हा प्रयत्न होता,” असा खळबळजनक दावा अभिजित तायडे यांनी केला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आता या ऑडिओ क्लिपमधील आवाजाची खातरजमा आणि कटाचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्र्यावरच थेट खुनाचा कट रचल्याचा आरोप झाल्याने आता या प्रकरणाला कोणते वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


