Ashok Kharat: महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या भूतकाळातील अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. खरातच्या सासरवाडीतील ग्रामस्थांनी त्याच्या लग्नातील एक थरारक किस्सा सांगितला असून, लग्नाच्या वेळीच त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची चिन्हे दिसली होती, असे समोर आले आहे.
हळदीच्या वेळी अंगावर दिसले होते जखमांचे वार
अशोक खरातचा विवाह 1992-93 च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे झाला होता. लग्नातील एका घटनेची आठवण सांगताना ग्रामस्थांनी धक्कादायक माहिती दिली. हळद लावण्याच्या विधीवेळी अशोक खरात अंगावरील शर्ट काढण्यास वारंवार नकार देत होता. उपस्थितांनी आग्रह धरल्यानंतर जेव्हा त्याने कपडे काढले, तेव्हा त्याच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आणि वार झाल्याचे दिसून आले. हे पाहून लग्नाला आलेले पाहुणे आणि ग्रामस्थ त्यावेळी हादरून गेले होते.
16 वर्षांपासून पत्नीचा माहेरशी संपर्क तोडला
अशोक खरातची फरार पत्नी कल्पना हिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तपासात समोर आले आहे की, गेल्या 16 वर्षांपासून कल्पना एकदाही आपल्या माहेरी गेली नव्हती. अशोक खरात तिला माहेरच्या लोकांशी किंवा भावाशी देखील संपर्क साधू देत नव्हता. पाडळी गावातील तिचे नातेवाईक केवळ अल्पशा शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत.
गावाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासला
पाडळी हे गाव माजी केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे गावाच्या नावावर विनाकारण डाग लागल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. “खरातने स्वतःच्या गावाचेच नाही, तर सासरवाडीचे आणि नातेवाईकांचे नावही खराब केले आहे,” असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
लग्नाला झाला होता तीव्र विरोध
सुरुवातीला या विवाहाला कल्पनाच्या घरातूनच विरोध होता. अशोक खरातचे वय जास्त असल्याने तिच्या एका भावाने या लग्नाला कडाडून विरोध केला होता. मात्र, तरीही हे लग्न कसे जमले, याचे गूढ आजही कायम आहे. सध्या ‘एसआयटी’ (SIT) पथक फरार कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाडळी आणि परिसरात कसून चौकशी करत आहे.


